कर्जत येथे उभे राहणार वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम ; ‘या’ अभिनेत्रीचा पुढाकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेव्हा आयुष्याचे सोनेरी क्षण जगतो. यानंतर विचार पडतो तो म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांशी गप्पा गोष्टी करण्यासाठी जमाव असावा. त्यावेळीच एकटे वाटायला सुरुवात होते. असेच आपल्याच बाबतीत नव्हे तर जीवनभर सुंदर आयुष्य जगणाऱ्या कलाकारांना ही होते. अशा वेळी त्यांना जर सांभाळण्यास कोणी नसेल तर त्यांच्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने एक पाऊल पुढे उचलले आहे. मुंबई जवळ कर्जत येथे तिने वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. यासाठी स्वामीधाम मोग्राज आनंदवाडी कर्जत येथे एका संस्थेने या वृद्धाश्रमासाठी जागा देखिल दिली आहे. त्यामुळे कलाकारांना एक आशेचा किरण दिसत आहे. येत्या 6 एप्रिल ला या ठिकाणी अन्नछत्राचे उद्घाटन होणार असून यावेळी
वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचा श्रीगणेशा होणार आहे.

लहानपणापासून सुंदर जीवन जगल्यानंतर वयाच्या शेवटी जर कोणी विचारपुस करण्यास नसेल तर ही त्यांच्यासाठी अतिशय खंतेची बाब आहे. या परिस्थितीचा विचार अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने केला आहे व तिने कलाकारांच्या मनातील खंत दुर करण्याचे ठरविले आहे. आपल्याकडे अनेक वृद्धाश्रम असतात. पण कलाकारांसाठी एक वृद्धाश्रम असावे हा विचार तिच्या मनात येणे म्हणजे काैतुकास्पद आहे.

विशाखा म्हणते, ‘मला काही वयवृद्ध कलाकार अत्यंत गंभीर परिस्थितीत दिसून आले. तेव्हापासून एकच विचार मनाला सतवत होता. एकदा वय निघून गेले की , आधारासाठी कोणी नसते. त्यामुळे मनात आलं की आपण स्वतः आपला आधार होणे गरजेचे आहे. अनेक वृद्धाश्रम असूनही देखिल मला वाटते की कलाकारांसाठी एक स्वतंत्र वृद्धाश्रम असावं जिथे गप्पा मारण्यासाठी सर्वजण असतील. सर्व कलाकार एकत्र असतील तर आठवणी-कल्पना याला उधाण येतं. त्यावेळेचा काळ आनंदी होतो. कलाकारांचा एकटेपणा दूर व्हावा या संकल्पनेतून एकट्या पडलेल्या वयोवृद्ध किंवा पन्नाशी ओलांडलेल्या कलाकार मित्र मैत्रिणींसाठी एक कलाश्रय सुरू करण्याचा विचार आहे.’