नदी-नाल्यासह कालव्यातील जलपर्णी हटविण्यासाठी अॅड. संजय सावंत यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जलपर्णी पाण्याच्या विसर्गालाही अडथळा ठरत आहे. तसेच ज्या ठिकाणी जलपर्णी आहे, तेथील नागरिकांना डास-मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातील सर्वच नद्या-नाल्यासह कालव्यातील जलपर्णी हटवण्याची गरज आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे पुणे जिल्हा कायदा आघाडी भाजपचे अध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांनी केली आहे.

ॲड. सावंत-पाटील म्हणाले की, पुणे शहर मुळा-मुठा, इंद्रायणी नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाले आणि कालव्यातील जलपर्णी हटविणे अत्यंत निकडीची बाब आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे. मुळा-मुठा नदी मुळशी येथून वाहत आहे. या नदीमध्ये अनेक औद्योगिक आणि शहरी विभागाच्या परिसरामधून होणारे प्रदूषण सर्वच नदीमध्ये उतरत आहे. त्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जलपर्णीमुळे स्थानिक नागरिकांना डेंगू, मलेरियासह साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. आळंदी-देहूमधील इंद्रायणी नदीमधील पाणी तीर्थ म्हणून प्रासन करतात. जलपर्णीमुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे नागरिकांसह मुक्याप्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाण्यातील ऑक्सिझनचे प्रमाण वेगाने घटत आहे. नद्यांचे एकूण जैविक पर्यावरण कोलमडून पडले आहे. नद्यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा, शेती- मासेमारी, जलपर्यटन, पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. नदीतील जलपर्णीचा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. डासांचा उत्पत्ती साठी पाणथळ जागा आणि त्यावर साचलेली जलपर्णी वनस्पती अनुकूल असते. त्यामुळे नदी काठी डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यातून थंडी तापाचे रुग्ण वाढत आहे. सध्या पुण्यात कोरोना साथीचा जोर वाढताना दिसतो आहे. नद्या प्रदूषणमुक्त करून पर्यावरण संतुलन राखत लगतचे परिसरात पर्यटन धोरण राबवणे गरजेचे आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.