Good News : अदानी ग्रुपकडून मोठी गुंतवणूक, तब्बल 48 हजार जणांना मिळणार नोकर्‍या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातल्याने उद्योगक्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. अनेक छोटे- मोठे उद्योग तोट्यात गेले आहेत. तर अनेकांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मात्र असे असतानाही काही बड्या उद्योगांनी संकटाचेही संधीत रुपांतर केल्याचे दिसून येत आहे. अदानी ग्रुपने देशात पुन्हा मोठी गुंतवणूक करत असून यातून तब्बल 48 हजारांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील, असे बोलले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, नोएडा प्राधिकरणाने अदानी ग्रुपच्या अदानी एन्टरप्राइझेस आणि डिक्सन टेक्नॉलॉजीसह 13 कंपन्यांना नोयडा विभागात औद्योगिक जमीन दिली आहे. नोएडा येथील सेक्टर 80 मध्ये 39 हजार 146 चौरस मीटर जमीन अदानी ग्रुपला मिळाली आहे. यात कंपनीकडून 2 हजार 500 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. या जमिनीवर अदानी एन्टरप्राइझेस डेटा सेंटरची स्थापना करणार आहे.

प्राधिकरणाने 4 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या औद्योगिक भूखंडांच्या वाटपासाठी प्रस्ताव मागवले होते. फेब्रुवारीमध्ये अर्जप्रक्रिया बंद केल्या होत्या बुधवारी याचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रक्रियेत एकूण 60 कंपन्यांनी अर्ज केला होता. मात्र यात केवळ 13 कंपन्यांना जमिनी दिल्या आहेत. नोएडा प्राधिकरणला या भूखंड वाटपांमधून 344 कोटींच्या उत्पन्नांची अपेक्षा आहे.