15000 कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी राज्यातील सिंचनासाठी देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. यांसदर्भात प्रस्ताव करुन राज्यपालांच्या सूत्रानुसारच त्याचे वाटप केले जाईल. तसेच तापीच्या प्रकल्पांना त्यातील वाटा देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, सरकार मोठ्या प्रकल्पांना गती देत आहे. धुळे आणि नंदुरबारच्या २२ उपसासिंचन प्रकल्पांसाठी ११५ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. कुऱ्हा वडोदा प्रकल्पासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव आहे.केंद्र सरकारचा मागील वर्षभरापासून काही प्रकल्पांत असणारा हिस्सा आला नाही. कोरोनाच्या काळात आर्थिकघडी विस्कटली. त्यामुळे निधी उपलब्ध न झाल्याने राज्याचा वाटादेखील कमी आहे. हा वाटा सध्या भरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी अतिरिक्त निधी लागेल. हा १५ हजार कोटींचा अतिरिक्त निधी बाहेरून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यपाल यांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निम्न तापी प्रकल्पाला हा वाटा मिळणार आहे. गोसेखुर्दमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेबाबत ते म्हणाले की, संवाद यात्रेच्या माध्यमातून खानदेशसह विदभार्तील ८२ मतदार संघातील कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. पुढील काळात मराठवाडा व कोकण भागाचा दौरा नियोजित आहे. तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. इतर पक्षांतील काही जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला असला तरी तो लवकरच सोडवण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.