‘मोक्का’ अन् वर्षभरापासून येरवडयात आरोपी ‘डॉक्टर’ ! ससूनमधील ‘कोरोना’ रूग्णांची आठवडयातून 5 दिवस सेवा करण्याच्या अटीवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी दिला जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोक्का खाली गेली १ वर्षे येरवडा कारागृहात असलेल्या डॉक्टराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी नुकताच २ महिन्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

हा जामीन मंजूर करण्यामध्ये मुख्य कारण म्हणजे या डॉक्टरांने ससून रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असे या डॉक्टराचे नाव आहे.

डॉ. भिसे याला २५ हजार रुपयांच्या बाँडवर त्यांना ६० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही शर्ती टाकल्या आहेत. त्यात डॉक्टराने आठवड्यातील ५ दिवस डॉक्टर म्हणून ससून रुग्णालयात कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करावेत. त्याने साक्षीदारांवर दबाव टाकू नये. या जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर रहावे. त्यावेळी त्याने ससून हॉस्पिटलच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा शर्ती टाकण्यात आल्या आहेत.

डॉ. भिसे व त्याच्या ४ साथीदारांना गेल्या वर्षी मे २०१९ मध्ये ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यास मंजूरी दिली. त्यानुसार काही हजार कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मात्र, डॉ. भिसे यांच्यावर मोक्कासारख्या गंभीर गुन्हा दाखल असल्याने त्यांची सुटका झाली नाही. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉ. भिसे यांनी स्वत: कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. त्यानुसार या अर्जाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. अतिरक्त सत्र न्यायाधीश सिरसीकर यांनी डॉ. भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतले. ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेली २० वर्षे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॉक्टिस करतात. त्यांचे पुण्यात घर आहे. ते पळून जाण्याची शक्यता नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांच्यावतीने अ‍ॅड. पी. डी. दुर्गे यांनी काम पाहिले.
न्यायालयाने डॉ. भिसे यांचा जामीन मंजूर करताना आपली निरीक्षणे नोंदविली. त्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा सर्व वैद्यकीय विभागावर मोठा ताण आला आहे. त्यामुळे शासनाने खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सेवा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच ससून रुग्णालयात सध्या ३६ खासगी डॉक्टर आपली सेवा देत असल्याचे न्यायालयाने सांगितले. आरोपीला वैद्यकीय सेवेचा अनुभव असून त्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाला उपयोग होईल, असे नमूद करीत त्याचा ६० दिवसांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like