PM मोदींनी केले जनतेला संबोधित, म्हणाले – ‘राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करत गरज असल्यासच घराबाहेर पडा असा संदेश दिला आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. आपल्याला लॉकडाऊन नको आहे. सर्व राज्यांनी देखील त्याबाबत विचार करावा आणि लॉकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवावा असं सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचं आव्हान मोठं आहे. पण आपल्याला सर्वांना मिळून रोखायचं आहे. देशातील सर्व डॉक्टर, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी, पोलिस दल, सुरक्षा दल या सर्वांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं होतं. आता दुसर्‍या लाटेत देखील सर्वजण दिवसरात्र युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. कठीण वेळी देखील आपल्याला धैर्य दाखवायला हवं. याच मंत्राला समोर ठेवून देश आज दिवस-रात्र काम करत आहे.

यापुर्वी काही जे निर्णय घेण्यात आले आहेत ते या परिस्थितीला सुधारणार आहेत. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यासंदर्भात युध्दपातळीवर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी संस्था काम करत आहेत. प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. राज्यांना ऑक्सिजन पोहण्यासाठी देखील जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वतोपरी ऑक्सिजन पोहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर फार्मा कंपन्यांनी औषधांचं उत्पादन वाढवलं आहे. आणखी त्यामध्ये गती येणार आहे. कालच फार्मा कंपन्यांच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली असून उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येकाची मदत घेतली जात असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. आपल्या देशात फार्मा सेक्टर खुप मोठं आहे. रूग्णालयातील ऑक्सिजन बेड आणि इतर बेड वाढवण्याचं काम चालू आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आपल्या देशातील वैज्ञानिकांनी व्हॅक्सीनवर काम सुरू केलं. आज जगातील सर्वात स्वस्त व्हॅक्सीन भारताकडे आहे. खासगी क्षेत्रानं खुप चांगलं काम केलं आहे. आपल्या भारतानं 2 व्हॅक्सीन बनवले आहेत. आतापर्यंत जगामध्ये सर्वात जास्त लसीकरण भारतामध्ये झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आतापर्यंत 12 कोटी जणांचं लसीकरण झालं आहे. फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. कालच आम्ही 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व वयोगटातील लोकांना लस देण्याचं जाहीर केलं आहे. लसीकरण मोहिमेत आणखी गती आणण्यात येणार आहे. सरकारी हॉस्पीटलमध्ये मोफत व्हॅक्सीन दिली जाणार आहे. त्याचा फायदा गरिब जनता उचलू शकेल. आमच्या सगळयांचे प्रयत्न हे जीवन वाचवण्यासाठी चालू आहेत. त्याच सोबत आर्थिक उलाढाल कमीतकमी प्रभावित व्हावी असा आहे. राज्य आणि केंद्राच्या प्रयत्नानं श्रमिकांना देखील लवकरात लवकर लस देण्यात येणार आहे. श्रमिकांनी सध्या जिथं आहे तिथंच थांबावं असं पीएम मोदींनी सांगितलं.

पुर्वी आपल्याकडे टेस्टींग लॅबची कमतरता होती, पीपीई कीट नव्हते मात्र आता सर्वच उपलब्ध झाले आहे. देशानं कोरोनाच्या विरूध्द आतापर्यंत खुप मजबुतीनं लढाई लढली आहे. याचं सर्वांचं श्रेय आपणास जात आहे. कोरोनाशी लढत असताना तुम्ही सर्वांनी देशाला इथं पर्यंत आणलं आहे. अनेक सामाजिक संस्था गरजुंना औषधं, अन्न-धान्य पोहचवत आहेत. मी सर्वांच्या सेवांना प्रणाम करतो. देशातील नागरिकांनी गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन देखील पीएम मोदींनी केलं. तरूणांनी सोसायटी, अपार्टमेंटमध्ये कमिटी बनवून कोरोनाचे नियम पाळण्याबाबत प्रयत्न करावेत. स्वच्छता अभियानादरम्यान लहान मुलांनी खुप मोठी मदत केली होती. त्यांनी मोठयांना देखील स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज मी लहान मुलांना आवाहन करतो की, त्यांनी विणाकारण कोणालाही घराच्या बाहेर जाऊ देवू नये.