‘ममता बॅनर्जी केवळ ढोंग करताहेत; अचानक सुरक्षा व्यवस्था कोठे गेली ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी (दि.10) नंदीग्राममध्ये हल्ला झाला. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यावरून आता आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहेत. या हल्ल्यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे, तर ममता बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला हा तृणमूल काँग्रेसचा ड्रामा असल्याचे भाजपने म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राजकीय पक्षांचे नेते यावर आपली मतं मांडत आहेत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अधीर चौधरी म्हणाले, ममता बॅनर्जी निवडणुकीत ढोंगीपणा करत आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला आहे. नंदीग्रामसह संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी यांनी स्वत:वर हल्ला करून घेण्याचे नाटक केले. स्वत:वर हल्ला करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

‘दूध का दूध और पानी का पानी होईल’

याशिवाय, ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना चौधरी यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआय, सीआयडी किंवा इतर कोणत्याही एजन्सीमार्फत करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असते, त्यांची सुरक्षा व्यवस्था अचानक कोठे गेली होती? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण भागामध्ये सीसीटीव्ही आहेत. ज्यावेळी चौकशी केली जाईल, त्यावेळी ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असे त्यांनी सांगितले. तसेच थोडी जखम झाली तरी चालता फिरता येते, मात्र ममता बॅनर्जी ढोंग करत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

बॅनर्जी यांच्या पायाला फ्रॅक्चर

दरम्यान, काल नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून, ममता बॅनर्जी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

भाजपला तयार राहण्याचा इशारा

ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा हॉस्पिटलमधील फोटो ट्विट करून भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने तयार राहावे, 2 मे रोजी बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा, असे अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.