Coronavirus : सामुहिक संसर्गामुळं राज्यात कडक लॉकडाऊन ? आरोग्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांच्या घरात पोहचली आहे. राज्यात विशेषत: मुंबई आणि महानगर क्षेत्रात येणाऱ्या मोठ्या उपनगरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचं कारण समूह संसर्ग (कम्युनिटी ट्न्सनिशन) आहे का, यावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काही भागत थोड्या फार प्रमाणात समूह संसर्ग झाल्याचे म्हटलं आहे.

पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक मोठ्या शहरी भागांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. पण या लॉकडाऊनचा आणि कम्युनिटी ट्रान्समिशनशी संबंध जोडू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना कम्युनिटी ट्रान्समिशनची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला. ठाणे, पुणे या शहरांमध्ये दुपटीपेक्षा अधिक रुग्ण याच कालावधीत वाढले. मुंबईत तर सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: मुंबई बाहेरच्या उपनगरांमध्ये या काळात कोरोना रुग्णांच प्रमाण वाढलं.

नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे भाईंदर, पनवेल आदी उपनगरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. याबाबत बोलताना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हा समूह संसर्गाचा प्रकार असू शकतो. मुंबईच्या आसपासच्या परिसरात 15 ते 20 टक्के कम्युनिटी स्प्रेड आहे. सरकार त्यावर काम करत आहे. म्हणूनच मुंबई महानगर परिसरातल्या काही भागामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत.