अदिती तटकरेंची पालकमंत्रीपदाची ‘निवड’ शिवसेनेसाठी ‘डोकेदुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसल्याने आमदारांच्या नाराजीमध्ये वाढ होत आहे. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. आघाडीत रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या कन्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या अदिती तटकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील सोपवण्यात आले आहे. मात्र यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत.

मागील दोन ते तीन दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून शिवसैनीक आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. रायगड जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. अन्यथा पदाधिकारी, शिवसैनिक आणि लोकप्रतिनीधी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी मंत्रीपदावरून अनेक नेत्यांमध्ये नाराजीजाचा सूर निघाला होता. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनीकांनी आणि लोकप्रतिनीधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने शिवसेनेची आणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/