हर्षवर्धन जाधवांच्या मुलाचं आईविरोधात पॅनल, जाणून घ्या कोणी मारली बाजी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार हर्षववर्धन जाधव यांच्या मुलगा आदित्य जाधवने आई संजना जाधव यांच्या पॅनल विरुद्ध उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

हर्षवर्धन यांच्या अनुपस्थितीत आदित्य जाधवने राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेत आईविरुद्ध पॅनल उभे केले होते. आदित्यने राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतल्याने या निवडणुकीची चर्चा जोरदार रंगली होती. पण, महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा पराभव केला आहे.

आदित्य हर्षवर्धन जाधवच्या पॅनलचे ५ उमेदवार निवडून आले तर संजना जाधव यांच्या पॅनलचे २ उमेदवार निवडून आले. पिशोर ग्रामपंचायतमध्ये पुंडलिक डहाके यांच्या पॅनलचे ६ उमेदवार निवडून आले. संजना जाधव यांच्यापेक्षा आदित्य जाधवला अधिक जागा मिळाल्याने आईपेक्षा मुलगा या निवडणुकीत वरचढ ठरल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.