मुंबई मनपा निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ‘पवार-ठाकरे-देशमुख’ अनुकूल ?

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणूकीत पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र दिसू शकतात याचे संकेत पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांनी दिले. संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या तरुण आमदारांसह सुसंवाद साधण्यात आला. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांचा समावेश होता. तर मुलाखतकार अभिनेते अवधूत गुप्ते होते.

यादरम्यान अवधूत गुप्तेंनी प्रश्न विचाराला की संपूर्ण महाराष्ट्र सध्या पाहतोय की, आदित्य ठाकरे-रोहित पवार एकत्र काम करत आहेत. हे पाहताना आनंद होतो. हेच चित्र येत्या काळात मुंबईत महापालिका निवडणूकीतही पाहायला मिळेल का? या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की नक्कीच, गेल्या काही काळापासून आम्ही तिन्ही पक्षाचे नेते मिळून काम करतोय. या काळात मला एक गोष्ट जाणवली की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे पक्ष जनतेसाठी काम करतात. त्यांच्यासोबत काम करणं सोपं आहे, कारण ही आपल्यासारखी लोकं आहेत. हे नेते लोकांचा विचार करतात. आमच्याप्रमाणेच महाराष्ट्राचा विचार करतात. आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे, तीन वेगळ्या टोकांचे पक्ष आहोत. परंतु तरी देखील एकत्र आहोत. राज्यासाठी एकत्र काम करत आहोत. तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येणे हिच लोकशाही आहे.

आदित्य ठाकरे आवर्जून म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षातील नेत्यांचे चांगले ऋणानुबंध होते आणि आहेत, आम्ही गेल्या अनेक वर्ष विरोधक राहिलो आहोत. परंतु आमचे जवळचे लोक एकमेकांच्या पक्षात आहेत. पवार कुटूंबाचे आणि आमचे संबंध मजबूत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी देखील आमचे संबंध उत्तम होते, त्यांच्यासोबत काम करणं सोपं होतं. ते मुख्यमंत्री असताना आमचा पक्ष विरोधात होता. परंतु कोणतीही कटूता नव्हती. माझी धीरजची, रोहितची मैत्री आहे. माझ्या आजोबांची शरद पवारांशी घट्ट मैत्री होती. ही सगळी नाती आता जवळ आली. कौटुंबिक नाती, मैत्री एकत्र आली. विशेष म्हणजे आम्ही अशा वेळी एकत्र आलो आहेत जेव्हा राज्याला त्याची गरज होती.

याच प्रश्नाचे उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की महाविकासआघाडीचे समीकरण एका विचाराचे आहे, हा एकत्र येण्याचा विचार पूर्वी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या मनात यापूर्वी आला असेलही. परंतु ते कधी बोलले नसतील. ते शक्य झालं नसेल. परंतु चार महिन्यापूर्वी हा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात आला. त्यांनी मनातलं बोलून दाखवलं, त्यामुळे सर्वांची मनं एकत्र आली. त्यातून वेगळं समीकरण बनलं आणि लोकांची सत्ता स्थापन झाली. पुढील काळात निवडणूका होणार आहेत, तेव्हा सर्वसामान्यांसाठी योग्य ते राजकीय समीकरत सर्वांना पाहायला मिळेल. नगर जिल्ह्यात सुद्धा महाविकासआघाडी आहे. हेच समीकरण बऱ्याच ठिकाणी दिसून येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/