महापूजा सुरु असताना आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागलं, त्यांनीच सांगितलं नेमकं काय झालं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आषाढी एकदाशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे हे देखील महापूजेला उपस्थित होते. दरम्यान, महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरे हे अचानक उठून बाहेर गेल्याने सोशल मीडियावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता स्वत: आदित्य ठाकरे यांनीच पुढे येत त्यावेळी नेमकं काय झालं याचा खुलासा ट्विट करत केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये त्यावेळी नेमकं काय झालं याची माहिती देताना सांगितले, माझी खुशाली विचारणारे असंख्य मेसेज मला सकाळपासून मिळाले आहेत. त्याबाबत मी तुमचे आभार मानतो. पहाटे विठ्ठल मंदिरात महापूजा आटोपल्यानंतर मला डिहायड्रेशनमुळे थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे मी काही वेळासाठी बाहेर आलो. मात्र, काही वेळाने मी पुन्हा पूजेमध्ये सहभागी झालो.

तसेच आषाढी एकादशीनिमित्त पूजेसाठी उपस्थित रहायला मिळणे हे आपल्यासाठी सन्मानीय असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी आई यांच्यासोबत आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रखुमाई माता यांच्या पूजेसाठी मला उपस्थित राहता आले, हे माझ्यासाठी सन्माननीय आहे.