विधिमंडळात शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ गेले, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज महाविकासआघाडीच्या आमदारांचा शपथ विधी पार पडला. यावेळी महाराष्ट्राच्या रजकारणातील अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाले. यापैकीच एक होता तो म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एक क्षण. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. शिवसेनेनं लाचारी पत्करल्याचंही त्यांनी म्हटलं. या टीकेला शिवसेनेनं अद्याप उत्तर दिलेलं नाही. परंतु आज विधीमंडळात शपथविधीदरम्यान जो काही प्रकार घडला त्यानंतर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

आदित्य ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसनाकडे चालत गेले. त्यांनी पुढे वाकून फडणवीसांशी हस्तांदोलन केलं. यावेळी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हेही फडणवीसांच्या बाजूला बसलेले दिसले. आदित्य ठाकरेंच्या कृतीने त्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं.

शपथविधीनंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. “एक आमदार म्हणून आज मी विधानभवनात आलो आहे. या आधी फक्त सत्र पाहण्यासाठीच इथे येत होतो. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो” असे ते म्हणाले.

Visit : Policenama.com