आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी कापलं संजय राऊतांच्या बंधुंचं नाव ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी होणार आहे. यासाठी महाविकासआघाडीच्या 35 आमदारांची नावं समोर आली आहेत. यात युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. अशी माहिती मिळत आहे की, आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळाच्या यादीतून एका नेत्याचं नाव कापण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचं नाव आदित्य ठाकरेंसाठी शेवटच्या क्षणी कापलं गेल्याचं समजत आहे.

दरम्यान, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं संजय राऊतांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरेंना पर्यावरण किंवा उच्चशिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. असे असताना आता आपल्या बंधूंना मंत्रिपद न मिळाल्यानं संजय राऊत नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय वर्तुळातही तशीच चर्चा सुरू आहे. परंतु संजय राऊतांना याबाबत विचारले असता त्यांनी मात्र नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/