Aditya thackeray on Corona Vaccination : ‘मुंबईमध्ये 3 आठवड्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह देशात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना लस देण्यास सुरुवात केली आहे. तर लसीकरणाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसीच्या थेट आयातीच्या शक्यतेवर विचार करत आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना लसीकरण केले जावे. जर असं झालं तर ३ आठवड्यांत मुंबईत सर्वांचं लसीकरण करण्याचा रोडमॅप आहे. असे ते म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत हे एक कारण नाही आणि राज्य सरकार लवकरच लस खरेदी करण्याचाही विचार करत आहे. इतर राज्यांप्रमाणे आम्हीसुद्धा लसीसाठी संघर्ष करत आहोत. आम्ही मुंबईसाठी जागतिक स्तरावर लसीची खरेदी करण्याची शक्यता पडताळून पाहत आहोत. जर आम्ही असं केलं, तर मुंबईच्या नागरिकांचं ३ आठवड्यांच्या आत लसीकरण करण्याचा रोडमॅप आमच्याकडे आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. कारण लस आल्यानंतर ज्या चिंता होत्या त्या आता पहिल्यापेक्षा कमी झाल्या आहेत. आता नागरिकांना लसीचे दोन्ही डोस हवे आहेत आणि मला वाटतं हे महत्वाचे आहे. तर जोवर सर्व भारतीयांचे लसीकरण होत नाही तोवर सर्व भारतीय सुरक्षित नसल्याचं देखील मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे. कोव्हीड लसीकरणासाठी राज्यासाठी वेगळे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्या. कोविन अ‍ॅपवर सातत्याने समस्या येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच, आता भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या कोविन अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अर्ज तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.