Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

औरंगाबादः पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. असे असताना आता भाजपा युवा मोर्चाने शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘नमस्ते संभाजीनगर’चे बॅनर झळकावले आहे. या बॅनरबाजीमुळे शहरातले राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ठाकरे आज शनिवारी (दि. 16) औरंगाबाद दौ-यावर आहेत.

संभाजीनगर नामकरणाच्या वादात आता भाजप युवा मोर्चाने उडी घेतली आहे. शुक्रवारी रात्री युवा मोर्चाने शहरात ‘लव्ह औरंगाबाद’ बोर्डाच्या समोर ‘नमस्ते संभाजीनगर’चे फ्लेक्स झळकावले आहेत. सर्वात आधी सेनेच्या वतीने सुपर संभाजी नगर बोर्ड लावला होता. त्यात उडी घेत मनसेनेही ही संभाजी नगर बोर्ड शहरात लावले होते. या बॅनरबाजीच्या खेळात शहरातील राजकीय वातावरण तापले होते. त्यात आता भाजप युवा मोर्चाने बॅनरबाजी केल्यामुळे यात भर पडली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्लुर नव्हता, असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला होता. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता. विशेष म्हणजे, औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव हा महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पण, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही.