ठाकरे घराण्याची परंपरा मोडत आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय समीकरणे नवीन वळण घेऊ लागली आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय पटलावर रंगू लागली आहे. आदित्य ठाकरे हे उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या जागी भाजपच्या पूनम महाजन खासदार असून त्यांची देखील पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. तर रामदास आठवले यांनी देखील हा मतदारसंघ स्वतःसाठी मागितला आहे.

शिवसेनेने जरी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाची मागणी केली असली तरी शिवसेनेला भाजप हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढावे असे भाजपच्या नेत्यांना वाटते आहे त्यामुळे शिवसेनेला तसे सुचवले जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा तर शिवसेनेचा स्वतःचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे गजानन किर्तीकर लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणून भाजप आदित्य ठाकरे यांना लढण्यासाठी या मतदारसंघाकडे बोट दाखवू शकते.

निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वतःला कधीच दूर ठेवले नाही. गरज पडेल तेव्हा मी निवडणूक लढवू शकतो. माझे आजोबा आणि माझे वडील या दोघांनी कोणतीही निवडणूक लढली नव्हती तरी ते मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवडून गेले होते असे मत मागे एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्यामुळेच त्यांचे ते मत आता सत्यात उतरवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. मात्र शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी  आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत असे म्हणले आहे.