गृहमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजप प्रवक्त्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक ठिकाणी राजकीय द्वंद सुरु आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणारे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार कुलकर्णी यांच्याविरूद्ध नागपूर ग्रामीण क्षेत्रातील कोंढाळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य सरकारतर्फे कोरोनासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असतानाही शिवराय कुळकर्णी यांनी ‘असा निर्लज्ज गृहमंत्री पुन्हा होणे नाही’ अशाप्रकारचे बदनामी व अपमानकारक वक्तव्य करून ते फेसबूकवर प्रसारित केले. यातील ‘निर्लज्ज’ या शब्दावर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी दिली.

राज्यात कोरोना बाधितांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. हे प्रशासकीय पातळीवरचे अपयश लपवण्यासाठी तसेच दरम्यान उघडकीस आलेले नियमबाह्य प्रकार झाकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणून राज्य सरकार गुन्हे दाखल करीत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी केली आहे.

आमदार रवि राणांविरुद्ध गुन्हा
अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आमदार रवी राणा यांच्यासह पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी रात्री 12.45 च्या सुमारास आमदार रवी राणा पाच कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी गेले होते. गाडगेनगर पोलिसांनी रवी राणा यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.