शेतकऱ्यांसाठी प्रशासन ‘अलर्ट’, पीककर्जासाठी दर सोमवारी बँकांची बैठक

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन- शेतकर्‍यांना पीक कर्ज वेळेवर मिळावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दर सोमवारी बँकांच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहे शिवाय प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकर्‍यांची माहिती ३० जूनपर्यंत केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याबाबत यंत्रणेलाही बजावले आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत पीक कर्ज, दुष्काळी कामांचा आढावा, स्वच्छता अभियान, अल्पसंख्याक विकासाच्या योजनांचा आढावा घेतला.

यावेळी विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या निकषात बदल केल्याने राज्यातील १ कोटी २0 लाख शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. पात्र शेतकर्‍यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. ३0 जूनपर्यंत ही माहिती अपलोड होईल, यादृष्टीने जिल्हाधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले आहे