धक्कादायक ! एकाच रुग्णवाहिकेतून 16 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, महाराष्ट्रातील घटना

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य प्रशासनावर याचा ताण वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, अमरावती प्रशासनाकडून या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे समोर आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. येथील 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना एकाच रुग्णवाहिकेतून उपचासाराठी चांदुर बाजार येथील रुग्णालयात उपचारासाठी कोंबुन नेण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचा देखील समावेश होता. प्रशासनाच्या या हालगर्जीपणामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या अमरावतीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार हजाराच्यावर गेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या 16 रुग्णांना चांदुर बाजार येथे आणल्यानंतर त्यातील चार कोरोना रुग्णांना उपचारासाठी अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णात हलवण्यात आले. चांदुर बाजार कोविड सेंटरमध्ये नेल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्णांनी केली. तर अनेकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा दावा काही रुग्णांनी केला आहे.