अजित पवार पुन्हा ‘ऍक्शन मोड’मध्ये; प्रशासनाला म्हणाले – ‘कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यात कोरोना व्हायरसचे संकट मोठे आहे. असे असताना कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. त्यादरम्यान अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, असे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये

राज्य शासनाकडून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद केलेली आहे. मात्र, लसींची उपलब्धता ही मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असेही अजित पवार यांनी सांगितले.