Pune : कंटेन्मेंट झोनमध्ये नवे भाडेकरू, घरेलू कामागरांना बंदी, प्रशासनाने केले स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिबंधित क्षेत्र आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील नियमावलीच्या संभ्रमातून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता नवी भाडेकरू, घरकाम करणाऱ्या किंवा इतर व्यक्तींना बंदी असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिका, ग्रामपंचायतीच्या प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय, आपत्कालीन सेवा, औषध विक्रीचे दुकाने आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास किंवा परिसरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. घरकाम करणाऱ्या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घर मालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास परवानगी नाही.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध, भाजीपाला, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशनक दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी, त्यावरील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

मदतनिसाला परवानगी मात्र
ज्येष्ठ नागरिकांना, रुग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक यांची मदत घेता येईल. तथापी, मदत करणारी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील असावी.
पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन
183 – पूर्ण झालेले कंटेन्मेंट झोन
133 – क्रियाशील कंटेन्मेंट झोन
हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी सांगितले की, प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केल्यानंतर 28 दिवसांच्या कालावधित संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सेवा पुरविणारे कर्मचारी वगळता इतर व्यक्तीला बाहेर जाण्यास किंवा सोसायटीमध्ये येण्यास परवानगी नाही. घरकाम करणाऱ्या व्यक्ती, नवीन भाडेकरूंना या क्षेत्रात प्रवेश मिळणार नाही.