कौतुकास्पद ! सर्वसामान्य कुटूंबातील मुलगी बनली अमेरिकेत सहाय्यक संशोधक अधिकारी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – एका सर्वसामान्य कुटूंबातील मुलीने आपली मजल सरळ परदेशात मारली आहे. तिचे घरचे भाजीविक्रेते आहेत अशा काबाड कष्टातून तिने अतोनात कष्ट करून शिक्षण पूर्ण केलं. ती अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये अधिकारी बनली आहे. सध्या अमेरिकेत सहाय्यक संशोधक अधिकारी (Assistant Research Officer) म्हणून ती कर्करोगावर संशोधन करीत आहे. त्या मुलीचे नाव सपना असे आहे.

कुटूंबातील परिस्थिती हालाखीची असली तरी सपनाने प्रयत्न सोडले नाही जिद्द सोडले नाही. सपनाचे आई वडील अशिक्षित. वडील भाजीविक्रेते, तर आई शेतमजूर. सपनाची आई अष्टशीला, मोठी बहीण सोनू आणि लहान बहीण संध्या तसेच लहान भाऊ संदेश यांचे प्रयत्न सपनाला अधिक बळ देत आहे. सपनाने प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले. १० वीत बाभूळगाव तालुक्यातील कोटांबा येथे होती. तर १२ वी सायन्स आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथून पूर्ण केले.

यानंतर बाबासाहेबांचे उच्च विचार सोबतीला घेऊन, सपनाने शिक्षणाचा ध्यास घेऊन यवतमाळ येथून बी फार्मचे शिक्षण पूर्ण केले. एम. फार्मसाठी सरकारी कोट्यातून तिची मोहाली (पंजाब) येथे निवड झाली. तिने तेथे सुवर्णपदक प्राप्त करून एम. फार्मचे शिक्षण पूर्ण केले. संस्थेतर्फे हैदराबाद येथे तिचा PHD साठी प्रवेश झाला. तिला ४५ हजार रुपये महिना स्कॉलरशिप मिळत होती. पैकी ३० हजार रुपये सपना दरमहा वडिलांना जुना धामणगाव येथे पाठवीत होती. सपनाची PHD होताच तिची निवड अमेरिकेतील एका प्रतिष्ठित स्कूल ऑफ मेडिसिन सेंट लुईस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी प्रोफेसर पदावर झाली. आज ती संशोधन अधिकारी म्हणून कर्करोगावर अभ्यास करीत आहे.