भेसळयुक्त प्लाझ्माने रूग्णाचा मृत्यू ! जाणून घ्या कसे चालत होते हे रॅकेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सातत्याने खाद्यपदार्थांपासून अनेक वस्तूंमध्ये भेसळीच्या बातम्या येणे आता सामान्य झाले आहे, परंतु नफेखोरांनी आता कोरोना महामारीत रूग्णांना देण्यात येणार्‍या प्लाझ्मामध्ये सुद्धा भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये अशाच प्रकारच्या एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. तज्ज्ञांनुसार, प्लाझ्मामध्ये भेसळ म्हणजे मृत्यूची गॅरंटी होय.

दूधात भेसळ, मिठाईत भेसळ, तूपात भेसळ, तेलात भेसळ, धान्यात भेसळ करून सुद्धा नफेखोरांचे मन भरलेले नाही, आता तर त्यांनी कोरोनासारख्या गंभीर आजाराला सुद्धा नफेखोरीचे साधन बनवले. जो प्लाझ्मा कोरोनाच्या आजारात रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी वापरला जातो, तोच प्लाझ्मा एका गरीब रूग्णाच्या मृत्यूचे कारण ठरला.

हैराण करणारे हे प्रकरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून समोर आले आहे. येथे पोलिसांनी जेव्हा एका ब्लड बँकेच्या कर्मचार्‍याला अटक केली, तेव्हा भेसळयुक्त प्लाझ्माच्या एका अशा रॅकेटचा पर्दाफाश झाला, ज्याबाबत जाणून स्वत: पोलीस सुद्धा हैराण झाले.

10 डिसेंबरला ग्वाल्हेरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल दतियाचे एक व्यापारी मनोज गुप्ता यांना प्लाझ्मा दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. मनोज गुप्ता 3 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. 7 डिसेंबरला डॉक्टरांनी मनोज यांच्या कुटुंबियांना सांगितले की, त्यांना प्लाझ्मा थेरेपी द्यावी लागेल. 8 डिसेंबरला कुटुंबिय मार्केटमधून प्लाझ्मा घेऊन आले आणि डॉक्टरांनी मनोज गुप्ता यांना प्लाझ्मा लावण्यास सुरूवात केली.

कुटुंबियांना रितसर ग्वाल्हेरच्या जयारोग्य हॉस्पिटलच्या ब्लड बँकेची रिसिट आणि क्रॉस मॅचिंग रिपोर्ट देण्यात आला होता. प्लाझ्मा चढवत असताना अचानक मनोज गुप्ता यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करावे लागले. 10 डिसेंबरला मनोज गुप्ता यांचा मृत्यू झाला. याच दिवशी त्यांचे कुटुंबिय प्लाझ्माचा क्रॉस मॅच रिपोर्ट आणि रिसिट घेऊन जयारोग्य हॉस्पिटलमध्ये पोहचले तेव्हा समजले की, तेथून प्लाझ्मा देण्यात आला नाही. यानंतर कुटुंबिय पोलिस ठाण्यात पोहचले आणि तक्रार दाखल केली.

11 डिसेंबरला आरोग्य विभागाने प्लाझ्मा जप्त करून तो तपासणीसाठी पाठवला, ज्याचा रिपोर्ट 12 डिसेंबरला आला. रिपोर्टमध्ये आढळले की, प्लाझ्मामध्ये भेसळ करण्यात आली होती. दुसरीकडे मनोज यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा या गोष्टीची माहिती मिळाली की, रक्तात इन्फेक्शन झाले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची कक्षा वाढवली आणि अपोलो हॉस्पिटलचा सिक्युरिटी गार्ड भदकारियाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका खासगी हॉस्पिटलचा कर्मचारी महेश मौर्यबाबत सांगितले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता राधास्वामी ब्लड बँकेचा देवेंद्र गुप्ता, अजय त्यागी आणि मनीष त्यागी यांची भूमिका समोर आली.

पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता समजले की, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड अजय त्यागी आहे, ज्याने कोरोनामध्ये प्लाझ्माचे महत्व पाहता प्लाझ्मामध्ये भेसळ करून नफा कमावण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारून जयारोग्य हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे बनावट सील, प्लाझ्मा भरण्याच्या जवळपास 200 बॅग, डिस्टिल्ड वॉटर, नॉर्मल सलाईन, रेड क्रॉसच्या बनावट रिसिट, जयारोग्य हॉस्पिटलचा क्रॉस मॅचिंग रिपोर्ट, प्लाझ्मा पॅकिंगचे सामान जप्त केले.

एसपी अमित सांघी यांनी सांगितले की, चौकशीत अजय त्यागीने आपला गुन्हा कबुल केला आहे. कशाप्रकारे प्लाझ्मामध्ये भेसळ करून नफा कमावला जात होता, हे त्याने सविस्तर सांगितले. भोपाळ एम्सचे डायरेक्टर डॉ. रमन सिंह यांनी सांगितले की, प्लाझ्मामध्ये भेसळ असल्यास किडनी फेल होते आणि रूग्णाचा मृत्यू होतो.

ग्वाल्हेरमध्ये हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर शिवराज सरकारचे आरोग्य मंत्री डॉ. प्रभुराम चौधरी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात अजून अनेक बाजू समोर येऊ शकतात, कारण पोलिसांना संशय आहे की, या गोरख धंद्यात आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो.