डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या ‘चार्जशीट’मध्ये पिस्तूलाचा ‘गोंधळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रांमध्ये विरोधाभास असून पुणे पोलीस आणि सीबीआयने केलेल्या तपासात ४ पिस्तूलांचा गोंधळ दिसून येत असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयात केला.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील पिस्तूलात साधर्म्य
दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील १ पिस्तूल, कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील २ पिस्तूल आणि कलबुर्गी यांच्या खून प्रकरणातील १ पिस्तूल यांच्यात साधर्म्य असल्याचे तपास यंत्रणेने फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे न्यायालयात सांगितले. तर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरने ठाण्याच्या खाडीत पिस्तूलाची विल्हेवाट लावल्याचा दावा सीबीआय करत आहे. मात्र ते अद्याप मिळाले नाही. तसेच ते शोधण्याचा त्यांचा प्रयत्नही नाही.

दोन दोषारोपपत्रांत विरोधाभास
दाभोलकर यांच्या खून प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांनी मनीष नागोरी, विकास खंडेलवाल या दोघांनी खून केल्याचे सांगून १ पिस्तूल जप्त केले होते. त्यानंतर ते पिस्तूल मुंबईतील कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले. तेथील अहवालानुसार याच पिस्तूलाने खून केल्याचे सांगितले गेले. मात्र नागोरी आणि खेंलवाल यांच्याविरोधात ९० दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्यांची न्यायालयाने सुटका केली.

तर सीबीआयकडे तपास दिल्यानंतर फरार असलेले सनातनचे साधक सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी खून केल्याचे सप्टेंबर २०१६ मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. तर अकोलकर आणि पवार यांना २ प्रत्यक्षदर्शींनी ओळखले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या दोन दोषारोपपत्रांमध्ये विरोधाभास दिसतो आहे. दाभोलकर यांच्या खुनात नेमके कोणते पिस्तूल वापरले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे सांगण्यात आले.

पुनाळेकर यांच्या विरोधात पुरावा नाही
शरद कळसकर याचा जबाब ७ महिन्यांपुर्वी घेतला आहे. त्याशिवाय सीबीआय़कडे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे पुनाळेकर यांनी कोणत्याही प्रकारचा संगनमताने कट रचला नसताना त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या निवाड्यांचे दाखले न्यायालयात दिले.

Loading...
You might also like