भूमिका काय ठरवता, कामाला लागा खा. गांधी यांना भाजप नेत्याचा सल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नगरला डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे तुम्ही भूमिका काय ठरवता, पक्षाचा आदेश पाळा. निवडणूक प्रचाराच्या कामाला लागा, असा सल्ला खा. दिलीप गांधी यांना भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी दिला आहे.

डॉ सुजय विखे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व अभय आगरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना आगरकर म्हणाले की, ‘भाजपात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांचा आदेश चालतो. त्यांच्या आदेशावरच भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत म्हणविणार्‍यांनी पक्षाचा प्रचार सुरू केला पाहिजे.’

उमेदवारी नाकारल्याच्या मुद्यावर पुढील दिशा ठरविण्यासाठी खा. दिलीप गांधी यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक रविवारी आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खा. गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आजही गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.