पुण्यात विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांना गुलाबपुष्प भेट देवुन गांधीगिरी स्टाईलनं सुरक्षित राहण्याचा सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ होत असल्याने कडेकोट लॉकडाउन करण्यात आले आहे. पोलीस दिवसरात्र नागरिकांसाठी रस्त्यावर उभा राहून काम करत आहेत. परंतु, त्यानंतरही काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. पोलसांनी मात्र या रिकामटेकड्यासमोर हात जोडले असून, या नागरिकांना गुलाबपुष्प भेट देऊन गांधीगिरी स्टाईलने त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासन काम करत आहेत. पोलीस जीवाची बाजी लावत 24 तास काम करत आहे. परंतु अनेकजण पोलीस व प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळत नाहीत. त्याचा ताण अश्या काळात प्रशासनावर पडत आहेत. यावेळी अनेकांना प्रथम काठीचा प्रसाद दिला. नंतर कायदेशीर कारवाई केली. तरीही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग निवडला आहे.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पोलिसांनी वारंवार विनंती, सूचना करुनही विनामास्क प्रवास, ट्रीपलसीट, विनाकारण फिरणाऱ्याच्या संख्येत घट झाली नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट गुलाब फुले विकत घेउन भटकंती करत फिरणाऱ्यावर देण्यास सुरुवात केली. “गुलाबपुष्प घ्या आणि घरी थांबा, कुटूंबाचा जीव धोक्यात घालू नका, सोशल डिस्टन्स पाळा, दुचाकीवरील प्रवास टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका, लहान मुले, जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या, मास्कचा वापर करा, गुलाब पुष्प घ्या अन् सुरक्षित घरी जा” असा सल्ला देत बिबवेवाडी पोलिसांनी गांधीगिरी केली. या गांधीगिरीने नागरिक देखील आवक झाले. त्यांनी पोलिसांच्या कार्याला सॅल्युट करत कौतुक केले आहे.