६० हजाराची लाच घेताना वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – खुलताबादचे नायब तहसीलदार यांच्याकडील दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका वकिलाला रंगेहाथ पकडले.
शरद विठ्ठलराव भागडे (वय ३५, रा. सातारा परिसर, औरंगाबाद) असे या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रारदार यांचा दावा दाखल आहे. त्यात हिबानामाच्या आधारे दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे शरद भागडे यांनी सांगितले. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस. आर. जिरगे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून अ‍ॅड. शरद भागडे यांना ६० हजार रुपये लाच घेताना पकडण्यात आले. याप्रकरणात नायब तहसीलदार यांची काय भूमिका आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, तब्बल १०० कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीच्या दाव्याच्या निकालासाठी अ‍ॅड. रोहित शेंडे याला पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना गेल्या वर्षी अटक केली होती. त्यानंतर केलेल्या तपासात भूमी अभिलेखाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचाही त्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांनाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like