काश्मीर मुद्द्यावर बाजू मांडणार्‍या वकिलाची गोळी घालून हत्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – श्रीनगरमध्ये काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नामांकीत वकील बाबर कादरी यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर कादरी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बाबर कादरी यांनी काही दिवसांपूर्वी टीव्ही डिबेटमध्ये काश्मीर मुद्द्यावर मत व्यक्त केले होते. त्यावरून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हावल परिसरात सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांला दहशतवाद्यांनी बाबर कादरी यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी कादरी यांच्यावर जवळून गोळी झाडून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत बाबर कादरी यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी परिसर सील केला आहे. नाकाबंदी करण्यात आली असून घटनेच्या पार्श्वभूमीवर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कादरी यांनी एक ‘स्क्रीनशॉट’ ट्वीट केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटले होते. संस्थांसाठी मोहीम राबवतो, अशा माझ्याविरोधात अफवा पसरवणार्‍या शाह नजीरविरोधात एफआयआर दाखल करा, अशी विनंती त्यांनी जम्मू पोलिस प्रशासनाला केली होती. खोट्या वक्तव्यांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे कादरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.