मुंबईवर हवाई हल्ल्याची शक्यता, पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईतील पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईत २२ फेब्रुवारीपर्यंत ड्रोन, पॅरागायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत सेना भवन, परेड ग्राऊंड तसेच महत्वाच्या स्थळावर हवाई हल्ला होऊ शकतो, असा हा संदेश केंद्रीय गुप्तचर विभागाने दिला आहे. या इशाऱ्यामुळे मुंबईतील पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या हालचाली वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी शहरात येणाऱ्या वाहनांवर तसेच संशयास्पद वाटणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व हॉटेल, लॉजेसची तपासणी सुरु केली आहे.

मुंबईत विविध कार्यक्रमासाठी ड्रोनचा वापर केला जातो़ मात्र, या इशाऱ्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारे ड्रोनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पॅरागायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. २६जानेवारी रोजी कोणत्याही प्रकारे हवाई हद्दीत कोणत्याही वस्तूने प्रवेश करणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. २६ जानेवारीच्या दिवशी ३५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मुंबईत तैनात करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –