Coronavirus : खोकताना आणि शिंकताना 10 मीटरपर्यंत पसरतो कोरोना व्हायरस; सरकारची नवी गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता याच व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती समोर आली आहे. खोकताना आणि शिंकताना 10 मीटरपर्यंत कोरोना व्हायरस पसरतो, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, व्यक्तीच्या खोकला आणि शिंकण्यातून 10 मीटर अंतरापर्यंतही कोरोनाची बाधा होऊ शकते. हेच कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मास्क वापरणे सर्वात गरजेचे आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. इतकेच नाहीतर लक्षणे नसणाऱ्या व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने व्हायरसचा संसर्ग होतो. देशातील अनेक राज्यांत रस्त्यांवर थुंकल्याने दंडात्मक कारवाई केली जाते आहे.

तसेच सरकारकडून हाय कॉन्टॅक्ट पॉईंट्सची नियमित साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये डोअर हँडल, लाईट स्विच, टेबल्स, चेअरचा समावेश आहे. या सर्व वस्तूंना ब्लिच किंवा फिनेलने साफ करण्याचे सांगितले आहे. कोरोनापासून बचावासाठी डबल मास्क किंवा N95 मास्क वापरणे गरजेचे आहे.

कॉटनचा मास्क असेल तर…

जर तुम्ही कॉटन कपड्याचा मास्क वापरत असाल तर तुम्ही दोन मास्क लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही सर्जिकल मास्कचा वापर करत असाल तर एकच मास्क चालू शकतो. डबल मास्क तुम्ही 5 वेळा वापरू शकता. व्हेंटिलेशन असणाऱ्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा कमी धोका असतो. त्यामुळे तुमचे घर आणि कामाचे ठिकाणावर व्हेंटिलेशन व्यवस्था चांगली असेल, हे पाहावे.