UP चा रहिवासी, अल कायदाचा असीम उमर USA च्या कारवाईत ठार, PM मोदींना दिली होती धमकी

अफगाणिस्तान : वृत्तसंस्था – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा भारत उपखंडातील प्रमुख मौलाना असीम उमर याला अफगाणिस्तानात ठार मारण्यात आले आहे. अफगानिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालकांनी ही माहिती ट्विट केली आहे. असीम हा अल कायदाचा प्रमुख आयमान अल जवाहिरीचा जवळचा होता. २०१५ मध्ये त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ मध्ये त्याने अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्लामचे शत्रू म्हणत त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या मूसा कला जिल्ह्यात एका कारवाईत अमेरिकन सैन्याने असीमला ठार केले होते. तो उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे खरे नाव सनाउल हक होते. असिमला २०१४ मध्ये अल कायदाचा प्रमुख आयमान अल जवाहिरी यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून भारत उपखंडातील प्रमुख म्हणून घोषित केले होते.

९० च्या दशकात सोडले घर
मौलाना असीम ओमर हा भारतीय असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासणीत उघडकीस आले. तो उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. मूळ नाव सनाऊल असणारा हा युवक ९० च्या दशकात घरातून गायब झाला. नंतर तो पाकिस्तानात असल्याची बातमी मिळाली. २०१६ मध्ये रॉ सह दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भारतात उपस्थित असलेल्या अल कायदाच्या अनेक दहशतवाद्यांना पकडले. यांच्या चौकशीत असीम उमर हा उत्तर प्रदेशमधील संभळचा सनाऊलच असल्याचे स्पष्ट झाले.

२०१६ मध्ये अमेरिकेच्या जागतिक दहशतवादी यादीमध्ये समावेश
अमेरिकेवर ९/११ च्या हल्ल्यानंतर त्याला अल कायदाच्या माहितीपटात ओसामा बिन लादेनबरोबरही पाहिले गेले होते. त्यामुळे अमेरिकेने त्याला २०१६ मध्ये ग्लोबल टेररिस्ट लिस्टमध्ये समाविष्ट केले होते. मौलाना ओमर याने अलिकडच्या वर्षांत भारतात जिहाद पसरवण्यासाठी अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओंमध्ये तो भारतीय तपास यंत्रणांवर आणि पोलिसांवर हल्ला करायला उद्युक्त होताना दिसला.

ओमरच्या पाकिस्तानी पत्नीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि अमेरिकन सैन्याने मोसा कला यांच्या कंपाऊंडमध्ये मौलाना उमर उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त ऑपरेशन केले. ओमरला पकडण्याच्या/ठार करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये ओमरने पळ काढल्याची बातमी होती पण यावेळी त्याच्या पाकिस्तानी पत्नीसह सहा पाकिस्तानी महिलांना अटक करण्यात आली होती.

Visit : Policenama.com