अफगाणिस्तानातील 5000 तालिबान्यांची सुटका होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला हिंसाचार थांबवल्यास तुरुंगात बंद असलेल्या जवळपास ५००० तालिबानी दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे की, नवीन निवडून आलेले सरकार तालिबान्यांसमोर झुकले आहे. दरम्यान अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांतता करारात तालिबानने कैद्यांची सुटका करण्यासाठी मागणी लावून धरली होती. परंतु अफगाण सरकारने त्यांच्या या मागणीस नकार दिला आणि त्या दरम्यानच बॉम्बस्फोट देखील झाला. दरम्यान अशरफ गनी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली असून तालिबान्यांनी सुटका करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मिळालेली माहिती अशी की सुरुवातीला १५०० तालिबान्यांची सुटका करण्यात येणार असून तालिबानासोबत हिंसाचाराच्या घटना थांबविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सर्व काही ठीक झाल्यावर मग पुढील टप्प्यात अजून ३५०० तालिबानी कैद्यांना सोडण्यात येणार आहे. तसेच बुधवारी तोडगा काढण्यासाठी तालिबानसोबत चर्चा करण्यात येणार होती, परंतु सुटकेच्या मागणीवर तालिबान ठाम असल्याने चर्चा अजून झालेली नाही. त्यामुळे या कैद्यांची सुटका करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले.