आफ्रिका देखील झाला पोलिओ मुक्त, आता फक्त ‘या’ 2 देशांमध्येच पोलिओचा आजार

नैरोबी : पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना संसर्गाचे २ कोटी ४० लाख ९५ हजार ६६० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ लाख २४ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाल्याची एक चांगली बातमी जगासमोर आली आहे. मंगळवारी आफ्रिका खंड पोलिओमुक्त झाला असल्याची घोषणा, आफ्रिका रिजनल सर्टिफिकेशन कमिशनने केली. आफ्रिका खंडातील नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओ मुक्त जाहीर करण्यात आला. दरम्यान, अद्यापही जगातील दोन महत्वाचे देश पोलिओ मुक्त झाले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिका खंडात वाइल्ड पोलिओचे शेवटचे प्रकरण चार वर्षांपूर्वी नायजेरियात आले होते. आफ्रिका खंडातील विविध देशांचे सरकार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रयत्न आणि समाजातील सर्व घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे १८ लाख बालकांना अपंगत्वापासून वाचवण्यात यश आलं आहे. पोलिओमुळे पाच वर्षापर्यंतच्या बालकांना अपंगत्व येण्याचा धोका असतो.

आफ्रिका खंडात जवळपास २५ वर्षांपूर्वी हजारो बालकांना पोलिओमुळे अपंगत्व आले होते. येथे पोलिओचा अटकाव करण्यासाठी लशीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. जगभरात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पोलिओ आढळला जातो. या आजारावर कोणताही उपचार नाही. पण पोलिओच्या लशीमुळे बालकांचे या आजारापासून संरक्षण करता येते.

नायजेरिया हा आफ्रिका खंडातील पोलिओमुक्त होणारा शेवटचा देश ठरला. नायजेरियात एका दशकांपूर्वी जगातील सर्वाधिक पोलिओबाधित आढळत होते. नंतर येथे मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम राबवण्यात आली. दहशतवादी हल्ले, काही ठिकाणी सातत्याने हिंसाचार सुरु असलेल्या अतिदुर्गम भागात जाऊन अनेक वर्ष लशीकरण मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये काही आरोग्य कर्मचारी ठार झाले. आता आफ्रिकेतील जवळपास ९५ टक्के नागरिकांमध्ये पोलिओविरुद्ध रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. भारत २०११ मध्ये पोलिओमुक्त झाला होता.