असाही १ चाहता : अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतरच पायात ‘चप्पल’ घालाण्याचा केला होता ‘निर्धार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या आवडत्या व्यक्ती किंवा अभिनेत्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्यांची या जगात कमी नाही. कुणी केस वाढवतो तर कुणी विना कपड्याचे फिरतो. अशाच प्रकारची एक घटना मराठवाड्यातील एका तालुक्यात घडली आहे. धामनगाव (तालुका वसमत) येथील सदाशिव बेले यांनी देखील अशीच प्रतिज्ञा केली होती. डॉ. अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार त्यांनी केला होता. अमोल कोल्हे यांचे खूप चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, मात्र अशा प्रकारे त्यांच्या विजयासाठी प्रतिज्ञा करणारे फार कमी.

अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातुन शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सदाशिव यांनी कोल्हेंच्या विजयासाठीचा पण केला होता आणि तो पूर्णदेखील केला. त्यांनी दोन महिने विना चपलेचे काढले आणि ते देखील मराठवाड्याच्या ४५ अंश सेल्सियस तापमानात. या दोन महिन्यात त्यांच्या पायाला अनेक जखमा झाल्या मात्र त्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी त्या सहन देखील केल्या.

या दरम्यान गावातील अनेक जणांनी त्यांची खिल्ली उडवली. चेष्टा केली. मात्र त्यांनी कुणालाही न घाबरता आपली प्रतिज्ञा आणि निर्धार पूर्ण केला. याचे त्यांना फळ मिळाले देखील. याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, माझ्या संभाजी महाराजांना ज्या कलम कसायांनी इतिहासात बदनाम करण्याचं काम केलं, त्याला पुसून खरा इतिहास जनतेपुढे माडूंन लहानांपासून-थोरांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन मी दोन महिने अनवाणी चालण्याचा निर्धार केला आहे”.

२३ मे रोजी झालेल्या मतमोजणीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला आणि सदाशिव बेले यांनी आपल्या गावात एकाच जल्लोष केला. त्यानंतर कोल्हेंच्या चाहत्याची हि बातमी कोल्हेंपर्यंत पोहोचवण्याचं कार्य म.से.सं.संभाजी बिग्रेडचे नेते रमेश हांडे यांनी केलं. यानंतर कोल्हे यांनी सदाशिव यांनी नारायणगावात बोलावून त्याची प्रेमाने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी कोल्हे यांनी आपल्या पायातील चप्पल बेले यांना देऊन त्यांना पेढा भरवला. कालपासून या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.