१८ वर्ष आणि ८ अयशस्वी प्रत्नानंतर त्यांना अखेर आपत्यप्राप्ती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपत्य प्राप्तीची तीव्र इच्छा असल्यानेच आणि डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे एका दाम्पत्याला तब्बल १८ वर्षानंतर आपत्यप्राप्ती झाली. या अठरावर्षात आपत्यप्राप्तीच्या ८ अयशस्वी प्रयत्नांचा सामना या महिलेला करावा लागला. हे दाम्पत्य पुण्यातील असून येथील मदरहुड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारामुळे अखेर या जोडप्याला आपत्यप्राप्ती आनंद अनुभवता आला आहे. ही सर्व गर्भावस्थेची प्रक्रिया अतिशय जोखमीची आणि गुंतागुंतीची होती.

पुण्यातील अनिता आणि वीरेंद्र त्रिपाठी या दाम्पत्याच्या १८ वर्षांनंतर आपत्यप्राप्ती झाली आहे. ३५ वर्षांच्या अनिता यांचा ४ वेळा गर्भपात झाला. याशिवाय त्यांच्या ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला. दर २ वर्षांनी त्यांना अशाच परिस्थितीला सामना करावा लागत होता. परंतु, या दाम्पत्याने आशा सोडली नाही. जून २०१८ मध्ये अनिता पुन्हा गरोदर राहिल्या. सात महिन्यांनी अचानक उल्बद्रव बाहेर आल्याने त्या खराडीतील मदरहूड हॉस्पिटलमध्ये आल्या. येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. भ्रूणाचा मेंदू सुरक्षित राहावा आणि फुफ्फुसे परिपक्व राहण्यासाठी योग्य ती औषधे, संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिजैविके आणि तत्काळ प्रसूती होऊ नये यासाठीही डॉक्टरांनी औषधे दिली.

या केस विषयी बोलताना येथील डॉक्टर म्हणाले, जगातील कोणत्याही इनक्युबेटरपेक्षा गर्भाशय हे सर्वोत्तम इन्क्युबेटर असते. यासाठी प्रसूती लांबवण्याचे आमचे प्रयत्न होते. गर्भाशयात पाणी नसल्याने बाळाला संसर्ग होणार नाही, तसेच अन्य समस्या निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात आली. ३० व्या आठवड्यात गर्भाशयात बाळाला धोका असल्याची लखणे दिसू लागल्याने या महिलेची प्रसूती करण्यात आली. अनिता यांनी ११ जानेवारी, २०१९ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचं वजन १.३ किलो होते. मात्र, जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता. यासाठी बाळाला निओनॅटल आयसीयूमध्ये दाखल करून आधुनिक नॉन-इन्व्हेसिव्ह तंत्राच्या साहाय्याने श्वसनास साह्य देण्यात आले. एका महिन्यात बाळाचे वजन १.७ किलो झाल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आपत्यप्राप्तीने सुखावेले बाळाचे वडील वीरेंद्र त्रिपाठी म्हाणाले, १८ वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे. मदरहुड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. अथक प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.