” चोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं ”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण मंत्रालयातून राफेलच्या कागदपत्रांची चोरी झाल्याच्या दाव्यावरून अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी घुमजाव केला. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात राफेल करारसंदर्भातील कागदपत्रे चोरीला गेल्याचा दावा केला. त्यानंतर शुक्रवारी मूळ कागदपत्रे नव्हे तर त्याच्या छायांकित प्रती चोरीला गेल्याचे सरकारने सांगितले. याचा अर्थ चोराने गुरुवारी राफेलची कागदपत्रे परत आणून ठेवली असतील, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे .

दरम्यान, ६ मार्चला सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार पडली होती. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेतला. हे पुरावे गोळा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयातील माहिती चोरण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. मात्र, शुक्रवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना के.के. वेणुगोपाल यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले.

https://twitter.com/PChidambaram_IN/status/1104218140744011776