महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का याची जोरदार चर्चा होत्या. मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर आता संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागेवर संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

संजय कुमार हे 1984 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर मावळते मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम बघणार आहे. मेहता यांच्याकडे कोविड 19 ची परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. मेहता यांनी अल्पावधीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे समजतेय.

निवृत्तीनंतर अजोय मेहता हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरु करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने मेहता यांचा प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मेहता हे 1984 बॅचचे असून त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.