Amazon नंतर ‘मनसे’चा आता थेट Dominos ला इशारा, कंपनीनं घेतला ‘हा’ निर्णय

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’, अशी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसेने (MNS) आता आपला मोर्चा पिझ्झा (Pizza) आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे (Dominos) वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. दरम्यान डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या मागणीची दखल घेत आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन मनसेला दिले आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आणि जग प्रसिध्द Amazon कंपनीत काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. या पार्श्वभूमीवर Amazon ने मुंबईतील दिंडोशीच्या दिवाणी न्यायलयात धाव घेतली होती. अखेर या वादावर पडदा टाकत कंपनीनं अ‍ॅमेझॉनची वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपवर मराठी झळकावणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पिझ्झा आणि इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजलाही मराठीच्या मुद्द्यावर इशारा दिला आहे.

डॉमिनोजने देखील मनसेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच डॉमिनोजच्या अ‍ॅपवर व वेबसाइटवर मराठीचा योग्य तो सन्मान दिला जाईल, असे ठाम आश्वासन दिले आहे. तसेच मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरु करण्याची तयारीही दर्शवली आहे. तसे पत्रच डॉमिनोजने मनसेकडे सादर केले आहे.