अबु आझमी यांच्याशी वादानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची तडकाफडकी बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रेल्वेने गाड्याविषयी माहिती न दिल्याने १० हजार लोक मुंबई रेल्वे स्टेशनबाहेर जमले होते. मात्र, रेल्वेने गाड्यांची माहिती न दिल्याने आत सोडण्यात आले नाही. यावरुन खासदार अबु आझमी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला. त्यावेळी त्यांनी बोललेले शब्द वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी खरे करुन दाखविले. रात्रीत नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची बदली करण्यात आली आहे.

नागपाडा पोलीस ठाण्याहून शालिनी शर्मा यांची चेंबूर पोलीस ठाण्यात तर, चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांची नागपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
हा प्रकार २७ मे रोजी रात्री घडला होता. रेल्वेने श्रमिक गाड्यांची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी कामगारांना रेल्वे स्टेशनबाहेर आणले. परंतु, स्टेशन बाहेर जवळपास १० हजार लोक जमले होते. त्यात कोणती गाडी कधी सुटणार याची माहिती रेल्वेकडून दिली जात नव्हती.

त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या आत पोलीस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर सोडता येत नव्हते. जवळपास ६ तास लोक आत जाण्याच्या प्रतिक्षेत थांबून राहिले होते. याचवेळी अबु आझमी तेथे आले. त्यांनी लोकांना आत सोडण्यास शालिनी शर्मा यांना सांगितले. मात्र, त्यांनी रेल्वेने नेमकी कोणती गाडी कधी सुटेल याची माहिती दिलेली नाही़ तोपर्यंत कोणाला आत सोडता येणार नाही, असे सांगितले. त्यात रेल्वेने गाड्या रद्द केल्याने पोलिसांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे अबु आझमी यांनी अपमानास्पद भाषेचा वापर केला. त्यात त्यांनी या परप्रांतीयांसमोर सर्व नियम धुडकावून भाषण ठोकले. त्यात त्यांनी उत्तर तुझ्या बापालाही द्यावे लागेल, अशी भाषा वापरली. जमलेल्या परप्रांतीयांनी त्यांच्या शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

याबाबत पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले की, रेल्वे रद्द करण्याशी पोलिसांचा काही संबंध नव्हता. वापरलेली भाषा चुकीची आहे. सहायक पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांनी सांगितले की, गाड्या रद्द होण्यात पोलिसांचा काही दोष नाही. रेल्वेने गाडीची घोषणा केल्यावर आम्ही प्रवाशांना तयार करुन ठेवतो. रेल्वेने गाड्यांची माहिती दिल्यानंतर त्यांना आत पाठवितो. मात्र, रेल्वेने गाड्यांच्या वेळा न कळविल्याने व आतील प्रवासी अगोदरच्या गाड्यांमध्ये बसून रवाना होत नाही तोपर्यंत आत सोडता येत नव्हते. त्यामुळे सुमारे १० हजार प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर ६ तास प्रतिक्षा करीत थांबावे लागले होते. अबु आझमी यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम तोडल्यानंतरही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांवर कारवाई केल्याने मुंबई पोलीस दलात संताप व्यक्त होत आहे.