मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने कुरियर बॉयचा बहिणींवर हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठीतून बोलण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका कुरियर बॉयने महिलेला शिवीगाळ करत तिच्या डोक्यात फटका मारला. एवढेच नाही तर तिच्या मदतीसाठी आलेल्या बहिणीच्या गालात पेन खुपसला. हा प्रकार दादरमध्ये शुक्रवारी घडला. याप्रकरणी पोलिसांनी कुरियर बॉयला अटक केली आहे.

इब्राहिम सामिजुद्दीन शेख (वय २८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता पेडणेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता पेडणेकर या दादर येथील न. चिं. केळकर रस्ता परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्या वृद्ध आई आणि दोन भावंडांसह त्या तेथे राहतात. शुक्रवारी कुरियर बॉय शेख दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी कुरियर घेऊन आला. त्याला पेडणेकर यांनी कोणते कुरियर आणले अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने समर्थ व्यायाम मंदिर का पुस्तक लेके आया हूम असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावर तो मैं हिंदूस्थानी हूं और महाराष्ट्र हिंदूस्थान में है असं म्हणाला. परंतु त्याच्याकडे पेडणेकर यांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. याचा त्याला राग आला. त्याने पेडणेकर यांना शिवी दिली. त्यानंतर पेडणेकर यांची बहिण विनीता यांना त्यांनी बोलवले. त्यांना प्रकार सांगितला. कुरियर घेण्यास त्यांनी विरोध केला आणि त्याचा फोटो काढून त्याच्या मालकाला दाखविण्याची धमकी त्यांनी दिली. याचवेळी त्याला राग आल्याने त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात त्याने पेडणेकर यांच्या डोक्यात फटका मारला. त्यानंतर विनिता मदतीसाठी पुढे आल्या त्यावेळी हातातील पेनच विनिता यांच्या गालात पेन खुपसला. त्यात  त्या जखमी झाला. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक जमा झाले. त्यांच्यापैकी एका नोकराने शेखला पकडले. त्यानतंर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शेखला अटक केली.