जामिनावर सुटलेल्या मंगलदास बांदलचे ‘मैं हूं डॉन`, FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   खंडणी प्रकरणात जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेल्या मंगलदास बांदल यांच “मै हू डॉन” सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र त्यांना हे गाणं महागात पडले असून, सोशल डिस्टसिंग पाळले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार ब्रह्मा पोवार यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगलदास बांदल आणि त्याच्या इतर 7 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात संचारबंदी आहे. 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरीकांनी सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र, बांदल व 7 जण एकत्र येऊन शेतात `मै हूॅं डाॅन` हे गाणे गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला. व्हिडीओत एकूण ८ ते १० जण दिसत आहेत. मात्र, तरीही बांदल यांच्यासह इतर त्यांचे मित्र स्पीकरवर गाणी म्हणत होते. मोठा साऊंडट्रकही लावण्यात आलेला होता. बांदल हे मेै हू्ॅ डाॅन हे गाणे म्हणत असल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. इतर जण त्यांना साथ देत आहेत. गाणे गाताना कोणीही मास्क घातलेला नव्हता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सराफी व्यावसायिकास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 लाख मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटले आहेत.