पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजप अन् राष्ट्रवादीनंतर राजू शेट्टींनी दिला ‘हा’ अधिकृत उमेदवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांच्या अर्जासोबत स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करत महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्यासाठी गावोगावी जाऊन प्रचार सभा घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर मतदारसंघावर आपला दावा केला होता. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टींची भेट घेऊन मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. तेव्हा राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनसुद्धा दिले होते.

पंढरपूर मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्याचा आग्रह करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याअगोदर संघटना या मतदारसंघातून निवडणूक लढल्याचे दाखले दिले होते. “रिडालोस’मध्ये २००९ मध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यावेळी खुद्द भारत भालके लढले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भालके त्या निवडणुकीत जायंट किलर ठरले होते. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांनीही २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भारत भालकेंनी परिचारकांचा पराभव केला होता.

राजू शेट्टी यांनी शेतीमालाच्या हमीभावासाठी तसेच, दूध आणि ऊसदारासाठी अनेक आंदोलने केली होती. या आंदोलनातून सरकारवर दबाव टाकत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे या भागात शेट्टी आणि स्वाभिमानीशी जोडलेले शेतकरी, कामगार आणि इतर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मागील निवडणुकांचा विचार करता हि जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी, अशी मागणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुकयातील पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केली होती. तेव्हा त्यांनी स्वाभिमानीकडून पंढरपूरचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णूपंत बागल, मंगळवेढा येथील ऍड. राहुल घुले या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या; पण मतदारसंघ स्वाभिमानीकडे घ्या, अशी विनंतीदेखील राजू शेट्टी यांना केली होती.