भाजपच्या ‘त्या’ दाव्यानंतर शरद पवारांंनी राज ठाकरेंबद्दल केलं ‘मोठं’ विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे मिळून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील जवळीक वाढली. परंतु विधानसभा निवडणूकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार एकत्र होते. मनसे आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. परंतु मनसे निवडणूक आघाडीत सहभागी झाली नसली तरी काही मतदारसंघात मनसेला पुरक अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती.

परंतु निवडणूकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणं बदलली. शरद पवारांच्या पाठिंब्यावर राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या दुरावा निर्माण झाला आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास धरत भगव्या रंगाचा झेंडा आणला तेव्हा राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका केली होती.

एका मुलाखत शरद पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर भाष्य केले. ते म्हणाले की राज ठाकरेंना समर्थन देणारा मोठा वर्ग आहे. परंतु तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होतो का याबाबत शंका आहे, राज ठाकरेंची मतं जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात असे ही ते म्हणाले.

परंतु राज ठाकरेंबद्दल मतभेद असतील पण आमच्यात मनभेद नाहीत, सुसंवाद आहे, आजही आमचं बोलणं होत असतं. राजकारणात एक पोकळी असते, आता तीन पक्षांचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली आहे. विरोधकांची पोकळी भरुन काढण्याचे प्रयत्न मनसे करतेय, त्यामुळे ही पोकळी भाजप भरुन काढेल की मनसे हे येत्या काळात ठरेल असेही पवार म्हणाले.

दरम्यान, रिमोट माझ्या हातात नाही, आम्ही सरकार उभं केलं आहे, विचारल्याशिवाय मत द्यायचं नाही ही माझी भूमिका आहे. राज्याच्या हितात काही सूचना द्यायच्या असेल तर पक्षांच्या अंतर्गत चर्चा होते. केंद्र सरकारच्या बाबतीत महाराष्ट्राची भूमिका मांडायची असेल तर सगळेच एकत्र येतो. मार्क देण्यासाठी परीक्षेची वेळ आली नाही परंतु उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे असे म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कौतूक केले.

भाजपकडून शरद पवारांवर आरोप –
मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे वेगळेच राजकारण असल्याचे भाजप नेते गणेश हाके म्हणाले होते. या सगळ्यामागे शरद पवारांचे डोके आहे. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली आहे. त्यामुळे हिंदुची एकगठ्ठा मतं आता भाजपकडे जाऊ शकतात. याच मतांचे विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात आहे. त्यांच्याकडूनच मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रोत्साहन दिलं जातं आहे असा दावा गणेश हाकेंनी केला होता.