भारतात काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; रुग्ण सापडल्याने चिंतेत वाढ, जाणून घ्या लक्षणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने मोठे नुकसान झाले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड्स यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागली. कोरोनाचे हे संकट असतानाच नवे संकट उभे राहिले आहे. देशात काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचे रुग्ण आढळून येत आहेत. याचा सामना करत असतानाच आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडल्याने चिंतेत भर पडली आहे.

काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी (दि.23) उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळून आला आहे. पिवळी बुरशी ही अधिक घातक असल्याचे सांगितले जाते. पिवळ्या बुरशीचा रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.

पिवळ्या बुरशीची लक्षणं
– भूक कमी लागणे किंवा लागतच नाही, वजन कमी होणे, सुस्तपणा
– पू ची गळती आणि जखमेवर हळूहळू उपचार होणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे
– अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने रुग्णावर उपचार होणे गरजेचे आहे.

पिवळी बुरशी होण्याचे कारण
– अस्वच्छता हे या बुरशीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. शिळं अन्न खाऊ नये.
– घरातील दमटपणा हे देखील याचे एक कारण आहे. त्यामुळे अधिक दमट वातावरणात बुरशी होण्याचे संकट अधिक वाढते.

पिवळ्या बुरशीवरील उपचार
Amphotericin B Injection (ॲम्फोटेरिसिन बी इंजेक्शन) हे यावरील औषध आहे.