‘ब्लॅक फंगस’च्या नंतर आता ‘व्हाइट फंगस’चा धोका, शरीराच्या ‘या’ भागांवर करतोय अटॅक, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. पण या ब्लॅक फंगसचा धोका असताना आता व्हाईट फंगसही समोर आला आहे. याची काही प्रकरणेही आढळली आहेत.

बिहारमध्ये व्हाईट फंगसची चार प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये रुग्णांना व्हाईट फंगसची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांना पटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हाईट फंगस हा आजार ब्लॅक फंगसपेक्षा घातक आहे. कारण हा शरीरातील अनेक अवयवांवर हल्ला करतो. त्यामध्ये त्वचा, पोट, मेंदू, आतील अवयव आणि फुफ्फुस यासह तोंडालाही प्रभावित करतो. हा आजार घातक असला तरी अद्याप बिहार राज्याशिवाय इतर कोणत्याही राज्यात याची प्रकरणे आढळली नाहीत.

कोरोना व्हायरससारखाच घातक
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार कोरोना व्हायरससारखाच घातक असू शकतो. सध्या याच्या मृत्यूदराबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. कारण आता फक्त चार प्रकरणे समोर आली आहेत. व्हाईट फंगस झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनासारखेच लक्षणे दिसली आहेत. पण या सर्व रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

रुग्णांना करावा लागतो HRCT स्कॅन
वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, या व्हाईट फंगसने संक्रमित आढळलेल्या रुग्णांना HRCT स्कॅन करणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरससारखेच ब्लॅक फंगसही कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर हल्ला करतो.