ब्रेक निकामी झाल्याने पीएमपी घुसली थेट हॉटेलात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उतारावर पीएमपी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर सुसाट झालेली बस थेट एका हॉटेलमध्ये घुसली. चालकाने प्रसंगावधान दाखवत ती कठड्याला धडकवली परंतु वेगामुळे ती कठड्याशेजारी असलेल्या हॉटेलात घुसली. दरम्यान घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ही घटना सिंहगड महाविद्यालयाच्या उतारावर गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

सिंहगड महाविद्यालयाच्या बसथांब्याहून सायंकाळी पावणे चारच्या सुमारास बसचालक सोपान शिवराम जांभळे आणि वाहक मोहन दहिवळ हे बस घेऊन स्वारगेटकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी सिंहगड महाविद्यालायाचा थांबा सोडल्यानंतर बस वडगाव बु. कडे जाणाऱ्या उतारावर आली.

त्यावेळी या उतारावर खाली येताना बसने अचानक वेग धरला. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बसचालक जांभळे यांनी प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठडल्याला धडकवली. परंतु उतार असल्याने आणि गाडीचा वेग नियंत्रित होत नसल्याने ती कठड्याला धड़कून हॉटेलमध्ये शिरली.

त्यानंतर ती थांबली. सुदैवाने हॉटेलमध्ये जास्त लोक नव्हते. तसेच बसमध्येही जास्त गर्दी नव्हती. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. परंत पीएमपी बसचे वारंवार होणारे अपघात आणि धोकादायक बनत चाललेली पीएमपी बस हा पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे.

You might also like