‘चार्जर’पाठोपाठ ‘टी-४’ वाघीण मृतावस्थेत

पवनी : पोलीसनामा ऑनलाइन – उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यात ३० डिसेंबर रोजी ‘चार्जर’ नावाचा वाघ पर्यटकांना मृतावस्थेत आढळल्याची शाई वाळते न वाळते तोच दुसऱ्या दिवशी कक्ष क्रमांक २२६ मधील निमगाव सहवन क्षेत्रात टी-४ नावाची वाघीण मृतावस्थेत आढळून आली. सलग २ दिवसात २ वाघ मृतावस्थेत आढळले आहेत.

परिसरातील शेतात रानडुकराच्या शिकारीकरिता मोहफुलाच्या गोळ्यात थायमेट किंवा अन्य विषारी द्रव्याचा वापर करून ठेवण्यात आला असावा व ते रानडुकराने सेवन केल्यानंतर त्याची शिकारी वाघिणीने करून त्याचे मांस खाल्ले असावे. टी-१६ या वाघाने सुद्धा त्या रानडुकराचे मांस सेवन केले असावे, असा अंदाज शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही वाघांच्या पोटातून रानडुकराचे मांस व केस आढळून आल्यामुळे व्यक्त केला जात आहे. तसेच आज मिळालेल्या टी-४ या वाघिणीचा मृत्यू २४ तासाअगोदरच झाला असावा व त्यानंतर टी-१६ या वाघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे.

उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यात जयप्रसिद्ध ‘जय’चा अधिवास होता. तसेच पवनी शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्यागत स्थिती दिसून येत असल्याचे वन्यजीव विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ३० डिसेंबर रोजी टी १६ (चार्जर) या नर वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यजीव विभागात खळबळ उडाली होती.