मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार घेणार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असतानाच आता 1 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक शरद पवार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे आजारपणातून बाहेर आल्यानंतर ते अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी पुन्हा बैठकांचे सत्र सुरु केल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाची महामारी, आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नती आरक्षण आणि चक्रीवादळ अशा अनेक मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये देखील अंतर्गत कलह सुरु असल्याची चर्चा आहे. काँग्रेस शिवसेनेवर नाराज असून शिवसेना महाविकास सरकारमध्ये नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी 1 जून रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्र्यांना ते काय सूचना करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असून मंत्र्यांच्या बैठकीनंतर शरद पवार आमदारांची देखील बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.