‘विधी’ करून झाल्यावर महिलेनं पंडितांना ‘दक्षिणा’ म्हणून वाटल्या ‘नकली’ नोटा, पोलीस तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीतापूरच्या रामपूर भागात एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका आश्रमाची संचालिका विधी केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून नकली नोटा देऊन फरार झाली. पोलीस या महिलेचा तपास करत आहेत. या आश्रमातून 15 लाखांपेक्षा अधिक रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आश्रमाची संचालिका गीता पाठक नावाच्या महिलेने धन प्राप्तीसाठी 40 पंडितांना बोलवून एक विधी केला होता. विधी पूर्ण झाल्यावर दक्षिणा म्हणून नकली नोटांनी भरलेली कापडाची एका पोटली देऊन ती महिला फरार झाली. जेवणानंतर पंडितांनी पैसे वाटून घेण्यासाठी ती पोटली पाहिली असता नकली नोटा पाहून त्यांना धक्का बसला.

त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपासणी केली. पोलीस अधिकारी रवीशंकर प्रसाद यांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, गीता पाठक नावाची महिला महमुदाबाद तालुक्यातील टेरवा मनकापूर या गावात राहते. तिने धन प्राप्तीसाठी बाहेरून या पंडितांना बोलवून विधी केला होता.

त्यानंतर जेव्हा दक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा भारतीय मनोरंजन बँक लिहिलेल्या नकली नोटांनी भरलेली एक पोटली देऊन ती महिला फरार झाली. महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतक्या नकली नोटा कुठून आल्या याची चौकशी करण्यात येणार आहे.